इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटर मधून कोरोनाबाधित अथवा त्यांच्या निकटच्या संपर्कातील 100 टक्के व्यक्ती ब-या होऊन सुखरूप परतल्या घरी
नवी मुंबई - पहिला कोरोना बाधित व्यक्ती वाशीत सापडण्याच्या आधीपासूनच नवी मुंबई महानगरपालिकेने कोव्हीड 19 विषयी आवश्यक खबरदारी घेण्यास सुरूवात केली होती. सुरूवातीच्या काळातील कोव्हीड 19 विषयक शासकीय मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता परदेशी प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तींना क्वारंटाईन करणे आवश्यक होते.त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने योग्य जागांचा शोध सुरू केला असता कोन, पनवेल येथील इंडिया बुल्स इमारतींमध्ये क्वारंटाईन करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचनांस अनुरूप अशा स्वतंत्र इमारती उपलब्ध असून त्यामध्ये एका व्यक्तीसाठी एक अशा पुरेशा आकारमानाच्या स्वतंत्र खोल्या व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत योग्य अशा स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध असल्याचे मा. कोकण विभागीय आयुक्त यांचेमार्फत सूचित करण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार त्यामधील इमारती नवी मुंबई महानगरपालिकेकरिता उपलब्ध करून घेण्यात आल्या.
सुरूवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने आमच्या विभागात कोरोनाचे विलगीकरण कक्ष नकोत अशाप्रकारे येथील नागरिकांकडून विरोध होत होता. अशावेळी कोरोनाची संसर्गातून होणारी लागण टाळण्यासाठी प्रत्येकाला स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली अत्यंत उपयोगी व्यवस्था इंडिया बुल्स येथे सहजपणे व कमी खर्चात उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे कोव्हीड 19 उपचारासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य असे मोकळे वातावरण व हवामान याची त्याठिकाणी असलेली उपलब्धता याचाही विचार करण्यात आला व इंडिया बुल्स येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्यात आले.हे कोव्हीड केअर सेंटर नवी मुंबई शहरापासून काहीसे दूर अंतरावर असल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेतला. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यामध्ये अधिक सुधारणांच्या दृष्टीने निर्देशही दिले. तेथील वातावरण हे लवकर बरे होण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक होते व तेथे आवश्यक सुविधा व उपचारांची सोय व्यवस्थितरित्या उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे तेथील व्यवस्थेबद्दल अनेक नागरिकांनी विविध माध्यमांतून समाधानही व्यक्त केले. त्याठिकाणी कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रूग्णांसाठी स्वतंत्र इमारतीमध्ये व्यवस्था होती तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आल्याने क्वारंटाईन करणे आवश्यक असलेल्या नागरिकांसाठी स्वतंत्र इमारतीत व्यवस्था होती. ज्यामधून कोरोनाची साखळी खंडीत होण्यासाठी मदत झाली.त्यामुळे इंडिया बुल्स येथे दाखल करण्यात आलेल्या 10 एप्रिलपासून ते आत्तापर्यंतच्या नागरिकांची आकडेवारी तपासली असता 799 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती ब-या होऊन तसेच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या निकटच्या संपर्कात आलेल्या 931 क्वारंटाईन व्यक्तींपैकी 100 टक्के म्हणजेच 1730 व्यक्ती सुखरूप घरी परतल्या आहेत. त्यामुळे इंडिया बुल्स येथील कोव्हिड केअर सेंटरचा उपयोग निश्चितच चांगल्या प्रकारे झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याठिकाणी उपचार करणा-या किंवा आरोग्य सेवा पुरविणा-या एकाही डॉक्टर अथवा पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लागण झालेली नाही.यापुढील पावसाळी कालावधी लक्षात घेता इंडिया बुल्स येथे कोव्हीड 19 संबंधित व्यक्तींना कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यादृष्टीने तसेच सेक्टर 30 ए वाशी मध्ये सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेमार्फत सीसीसी व डिसीएचसी सुविधा असणारे कोव्हीड 19 रूग्णालय सुरू झाले असल्याने इंडिया बुल्स येथे सध्या कोव्हीड 19 संबंधित व्यक्ती न पाठविण्याचे महानगरपालिेकेने ठरविलेले आहे. तथापि त्याठिकाणी आत्तापर्यंत ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित वा त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या प्रकृती सुधारणेसाठी आरोग्याच्या दृष्टीने इंडिया बुल्स येथील व्यवस्था लाभदायकच ठरलेली दिसून येते.