कोव्हीड रूग्णांवरील उपचार आणि त्यासाठी आकारण्यात येणा-या दरांबाबत आयुक्तांचे आदेश जारी 


नवी मुंबई - 'मिशन ब्रेक द चेन' हाती घेत कोरोनाची साखळी खंडीत करणे आणि मृत्यूदर कमी करणे याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न केले जात असताना कोरोनाबाधित रूग्णांना योग्य प्रकारे व योग्य दरांमध्ये वैद्यकीय उपचार मिळावेत याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी व धर्मादाय रूग्णालयांना आदेश जारी केले आहेत.यानुसार कोव्हीड रूग्णांवरील उपचार आणि त्यासाठी आकारण्यात येणा-या दरांबाबत महाराष्ट्र शासनाने 21 मे रोजीच्या अधिसूचनेव्दारे जारी केलेला आदेश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे रूग्णालय व्यवस्थापनांना निर्देशित करण्यात आले आहे.या आदेशान्वये खाजगी व सेवाभावी रूग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्वे सूचित करण्यात आली आहेत.
                    नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक कोव्हीड रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना  (MJPJAY) यामध्ये नोंदणीकृत असेल.सर्व रुग्णालयांनी त्वरित रॅपिड अँटीजेन चाचणी सुविधा सुरू कराव्यात. आवश्यकता भासल्यास नवी मुंबई महानगरपालिकेकडून त्यांस रॅपिड अँटीजेन किट्स प्रदान करण्यात येतील. यासाठी रूग्णाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.प्रत्येक रुग्णालयात 80% बेड्स हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नियंत्रित केले जातील. त्या बेड्सचे शुल्क दिनांक 21 मे 2020 रोजीच्या शासन अधिसूचनेतील प्रपत्र - क मध्ये नमूद केलेल्या दरांनुसार आकारले जाईल. आदेशासह प्रपत्र - अ नुसार जोडलेल्या विहित नमुन्यातील बेड्स उपलब्धतेचा तपशील प्रत्येक रूग्णालयाने त्यांच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळील लॉबीमध्ये ठळक स्वरूपात स्पष्टपणे प्रदर्शित करावयाचा आहे.रुग्णालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रूग्णालयातील बेड्सवर उपचारार्थ दाखल रूग्णांचा अद्ययावत तपशील (Real Time Bed Occupancy Data) नियमितपणे भरावयाचा आहे. महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर दर्शविलेला रूग्णालयातील रिक्त बेड्सचा तपशील आणि प्रत्यक्षात असलेल्या रिक्त बेड्सच्या संख्येमध्ये विसंगती असता कामा नये.दिनांक 21 मे रोजीच्या शासन अधिसूचनेत नमूद दराचा तपशील रूग्णालयामार्फत सर्वांना दिसेल अशा मुख्य ठिकाणी प्रदर्शित करण्यात यावा. रूग्णावरील उपचाराच्या सर्व प्रकारच्या शुल्काची तपशीलवार माहिती रूग्ण / रूग्णाचे नातेवाईक यांना देणे हे रूग्णालयाचे कर्तव्य आहे.रूग्णालयात प्रवेशाच्या वेळी कोणत्याही रूग्णाकडून अनामत रक्कम मागता येणार नाही.कोणत्याही गंभीर रूग्णास रुग्णालयात दाखल करण्यासाठी संदर्भित करण्यात आल्यास त्याला आर्थिक क्षमतेच्या मुद्द्यावर प्रवेश घेण्यापासून वंचित ठेवले जाऊ नये.थेट रूग्णालयात येणा-या कोणत्याही रूग्णाला प्रवेश नाकारण्यात येऊ नये, विशेषत: जर त्या रूग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन 95 टक्केपेक्षा कमी असेल तर अशा रूग्णाला प्रवेशापासून वंचित ठेवू नये.जरी रूग्णालयात बेड उपलब्ध नसेल, तरी इतर ठिकाणी बेड उपलब्ध होईपर्यंत रूग्णालयातील ट्रायज विभागात त्या रूग्णाची प्रकृती स्थिर ठेवण्याच्या उपचार केले जातील, आणि इतर ठिकाणी बेड उपलब्ध झाल्यानंतर त्या रूग्णास ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रूग्णवाहिकेतून तेथे स्थानांतरित करण्यात येईल.कोणत्याही प्रकारचे मेडिकल इम्प्लान्ट, गाईडर - वायर कॅथेटर, पीपीई किट्स इ. अशा वस्तूंचे दर हे हाफकीन सारख्या मान्यताप्राप्त संस्थेने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त नसावेत. तसेच ते कोणत्याही परिस्थितीत निव्वळ खरेदी खर्चाच्या 10% पेक्षा अधिक असू नयेत. उपरोक्त नमूद केलेल्या वस्तू वगळता वापरण्यात आलेल्या वस्तुंच्या एकूण देयक रक्कमेवर 5 टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही.जर एखादी वस्तू एकापेक्षा जास्त रूग्णांसाठी वापरली गेली असेल तर त्याचा खर्च त्या रूग्णांमध्ये विभागला जाईल. उदा. पीपीई किट्सचा खर्च स्वतंत्रपणे प्रत्येक रूग्णाला न आकारता त्या वॉर्डमधील एकूण रूग्णसंख्येमध्ये विभागला जावा.रूग्णांसाठी सर्वसाधारणपणे जेनेरिक औषधांचा वापर करण्यात यावा व त्यानुसार शुल्क आकारण्यात यावे.देयकामध्ये कोणतीही संदिग्धता नसावी, ते सुस्पष्ट असावे आणि त्यामध्ये सर्व उपकरणे, वस्तू, औषधे यांची सविस्तर यादी वापरलेल्या संख्येसह आणि प्रतिनग दरासह स्पष्टपणे नमूद असेल याची खात्री करून घ्यावी. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या 9 मे रोजीच्या सुधारित डिस्चार्ज धोरणानुसार रूग्णांना डिस्चार्ज देण्यात यावा. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णाला त्याच्या निवासस्थानी जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत प्रत्येक पात्र रूग्णाला योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता रुग्णालय विमा एजन्सीची मदत घेऊ शकेल.कोव्हीड रूग्णांना, वैद्यकीय सल्ल्याविरूध्द सोडणे (LAMA) / वैद्यकीय सल्ल्याविरूध्द डिस्चार्ज (DAMA) देणे अनुज्ञेय असणार नाही. जर एखाद्या रुग्णाला दुसर्‍या वैद्यकीय सुविधेमध्ये स्थानांतरीत करावयाचे असल्यास रुग्णाला योग्य प्रकारची डिस्चार्ज / रेफरल नोट देऊन स्थानांतरीत करण्यात येत असल्याची रूग्णालयाने खात्री करून घ्यावयाची आहे. रूग्णाचे स्थानांतरण ऑक्सिजन सुविधा असलेल्या रूग्णवाहिकेतूनच केले जाईल याचीही दक्षता घ्यावयाची आहे.दुर्दैवाने एखाद्या रूग्णाचा मृत्यू झाल्यास, देयक रक्कमेचा भरणा केला नाही म्हणून रूग्णालयाने कोणत्याही रूग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यापासून रोखून ठेवता कामा नये.रूग्णालयाने रूग्णांना स्मार्ट फोन / टॅब्लेट वापरण्यास परवानगी द्यावी. जेणेकरून, रूग्ण त्यांच्या कुटुंबियांसह व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधू शकतील.ती उपकरणे निर्जंतुकीकरण करण्यासाठीच्या वेळा इ. बाबतच्या योग्य मार्गदर्शक सूचना संबंधित रूग्णालयांमार्फत सूचित करण्यात येतील.या मार्गदर्शक सूचना नवी मुंबई महानगरपालिेका क्षेत्रातील विविध खासगी / सेवाभावी रुग्णालयांना देतानाच त्याठिकाणी महानगरपालिकेमार्फत नियुक्त केलेले सर्व नोडल अधिकारी यांनी या आदेशाचे व त्यातील प्रत्येक मुद्दयाचे पालन संबंधित रूग्णालयाव्दारे केले जाईल तसेच रूग्णालयाकडून कोणत्याही रूग्णाची आर्थिक फसवणूक होणार नाही व त्याच्या उपचारामध्ये तसेच देयक रक्कमेमध्ये कोणतीही विसंगती राहणार नाही याची दक्षता घ्यावयाची असल्याचे आयुक्तांनी आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकही रूग्ण उपचाराविना राहू नये व रूग्णाला त्याच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार योग्य वैद्यकीय सुविधेच्या ठिकाणी, सुयोग्य उपचार हे शासनाने निश्चित केलेल्या दराने मिळावेत याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आग्रही असून त्यादृष्टीने खाजगी आणि सेवाभावी रूग्णालयांकरिता सर्व बाबी स्पष्ट करणारा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.


 


Popular posts
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
लोकमान्य मधील बातमीची दखल घेत दारावे गावातील अनधिकृत इमारतीवर सिडकोकडून तोडकं कारवाई , करावे गावातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकासक परेश पटेल व जितेंद्र मढवी यांच्या इमारतीवरही पडणार लवकरच हातोडा, दारावे गावातील कारवाई नंतर करावे गावातील अनधिकृत बांधकामे सिडकोच्या रडारवर ?
Image
नवी मुंबईतील करावे गावात शेकडो अनधिकृत इमारतींचे बांधकामे सुरु ? बेलापूर विभाग कार्यालय व सिडकोचे अर्थपूर्ण दुर्लक्ष ? भूमाफियांनी अभय २५ ते ३० लाख रुपयांची प्रति इमारत सेटलमेंट, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर हातोडा
Image
नागरी सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्याप्रमाणेच महसूल वाढीवर भर देण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
Image