नेरुळ मधील सनशाईन हॉस्पिटलची कोरोना रुग्णांकडून लूट
नवी मुंबई - कोरोना संक्रमित रुग्णांची उपचाराच्या नावाखाली लूट करणाऱ्या नेरुळ मधील सनशाईन रुग्णालयाला या पूर्वीच नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही त्याच रुग्णालयाने पुन्हा कोरोना रुग्णांना जादा बिले आकारली असल्याची बाब उघडकीस आली आहे.यावर पुन्हा प्रशासनाने या रुग्णालयाला नोटीस बजावली असून वाढीव बिल कमी करून घेतले आहे.मात्र यावर नोटीस ऐवजी पाच पट दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी ,मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर यांनी केली आहे.यापूर्वी शिवसेनेनेही याच रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली होती.
कोरोना बाधित रूग्णांवर त्यांच्या लक्षणांस अनुरूप योग्य प्रकारे उपचार केले जावेत व त्या उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांकडून निश्चित केलेले वाजवी शुल्क आकारले जावेत असे आदेश आरोग्य विभागाने जारी केलेले आहेत.या आदेशांकडे दुर्लक्ष करून नेरुळ मधील सनशाईन रुग्णालयाची लूटमार सुरूच आहे.नुकतचं या रुग्णालयाने एका रुग्णाला पी पी किट चे १ लाख ५० हजार ,लॅब टेस्टचे १ लाख रुपये व रुग्णवाहिकेचे ५ हजार असे बिल आकारले होते.हे बिल बघून रुग्णाच्या पायाखालची जमीनच सरकल्याने त्यांनी थेट याविषयी प्रवीण खेडकर यांच्या माध्यमातून मनपाकडे धाव घेतली.त्यावर मनपाने रुग्णालयाला नोटीस बजावत वाढीव बिल कमी करण्याच्या सूचना केल्या.त्यानंतर त्याच रुग्णायलमध्ये उपचारासाठी भरती असलेल्या सुभाष हडवले यांच्या पत्नी मागील 3 दिवसापासून डिस्चार्ज मागत असतांनाही त्यांना पैशाअभावी डिस्चार्ज दिला जात नाहीये.यावर पुन्हा प्रवीण खेडकर यांनी सदर बाब मनपाच्या निदर्शनास आणून दिली असता रुग्णांना योग्य तो न्याय मिळेल असे त्यांना सांगण्यात आले आहे.मनपाकडून 10 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढण्यात आले आहे त्यात सर्व खाजगी व चॅरिटेबल ट्रस्ट चे हॉस्पिटलाना महात्मा फुले जनआरोग्य योजने मध्ये रजिस्टर करावे असे सांगण्यात आले आहे असे असताना सुद्धा याचे पालन केले जात नाही.अश्या रुग्णालयांवर मुंबई नर्सिंग होम ऍक्ट 1949 नुसार कारवाई करावी अशी मागणीही खेडकर यांनी केली आहे.कोव्हीड 19 साथी रोगाची प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार आयुक्तांना असून सुद्धा का कारवाई होत नाही असा प्रश्नही प्रवीण खेडकर आणि चंद्रकांत उतेकर यांनी उपस्थित केला आहे.
कोट - नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी यापूर्वी याच रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली असतानाही पुन्हा तोच प्रकार आढळून आला.त्यामुळे पुन्हा नोटीस बजावून वाढीव बिल कमी करून घेतले आहे.यानंतरही जर असे प्रकार निदर्शनास आले तर योग्य ते पाऊल उचलले जाईल.
सुजाता ढोले - अतिरिक्त आयुक्त ,नवी मुंबई महानगरपालिका