नवी मुंबई - समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधून त्यांना उपचाराखाली आणणे तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व कुष्ठरुग्ण शोध अभियान” नमुंमपा कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर याच्या मार्गदर्शनाखाली, ही मोहीम राबविण्यात येत असून याकरिता 291 पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. ही पथके 1,01,698 घरातील 3,42,645 लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत माहिती प्रसारण आणि जनजागृती करणार आहेत. प्रत्येक पथक दररोज 25 घरांना भेट देऊन माहिती संकलन करणार आहे.प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरूष कर्मचारी असून घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यामार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरूष कर्मचाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे. तपासणीमध्ये कुष्ठरोगाकरिता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे क्षयरोगासाठी दोन आठवडयांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करून तपासणी करण्यात येणार आहे.यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास सदर व्यक्तीस वैदयकिय अधिकारी यांच्याकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे. तर क्षयरोगाची लक्षणे आढळयास 1 तासाच्या अंतराने दोन थुंकी नमुने घेण्यात येऊन एक्स रे करीता संदर्भित करुन तपासणीअंती निदान निश्चित करण्यात येणार आहे.नमुंमपा कार्यक्षेत्रात यापूर्वी आढळेलेले रुग्ण विचारात घेऊन सर्वेक्षण कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे. यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुसार 3,42,645 लोकसंख्येस 291 पथकांव्दारे 1 ते 16 डिसेंबर दरम्यान भेटी दिल्या जाणार आहेत.या अभियानाव्दारे समाजातील निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराचा वापर करणे व यामधून संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे आणि कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे उद्दिष्टपूर्तीसाठी काम केले जाणार आहे. तसेच क्षयरोगाच्या निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा प्रशिक्षित पथकाव्दारे शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे हे ध्येय साध्य करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी या मोहिमांस प्रतिसाद देऊन लक्षणे जाणवल्यास स्वत:ची कुष्ठरोग तपासणी करुन घ्यावी तसेच क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन अभियानाचे उद्दीष्ट साध्य करण्यात संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.