नवी मुंबई - सिडको महामंडळाकडून महासाथीच्या आणि टाळेबंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने भूखंड विक्रीच्या विविध योजना राबविण्यात असून, या योजनांना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. आता एका नवीन योजनेद्वारे, सिडकोकडून नवी मुंबईच्या ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेमुळे नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण शहरामध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची तसेच गुंतवणूकीची शेवटची संधी चालून आली आहे. कोविड-19 महासाथ व टाळेबंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या विविध योजना सिडकोने सातत्याने राबविल्या. या नवीन योजनेद्वारे वाजवी दरातील निवासी भूखंड उपलब्ध करून देत, नवी मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची संधी सिडकोकडून सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सिडकोकडून सातत्याने, नवी मुंबईतील निवासी, वाणिज्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उद्देशाकरिता असलेले विविध भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून दिले जातात. सदर योजने अंतर्गत सिडकोकडून ऐरोली, घणसोली, खारघर, कळंबोली आणि पनवेल नोडमधील मिळून एकूण 182 निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर भूखंड हे लहान आकाराचे असून 40 चौ.मी. ते 300 चौ.मी. दरम्यानच्या क्षेत्रफळाचे आहेत. सदर भूखंड हे किफायतशीर दरात उपलब्ध असून निर्वेध मालकी (क्लिअर टायटल) असणाऱ्या या भूखंडांना सिडकोची हमी आहे. सदर योजना ही ई-निविदा व ई-लिलाव पद्धीतीने पार पडणार असून भूखंडांच्या तपशिलासह वेळापत्रक नमूद असलेली योजना पुस्तिका 22 जून 2021 पासून सिडकोच्या https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निविदाकारांची नोंदणी, अर्ज सादर करणे व अनामत रकमेचा भरणा करणे, या प्रक्रिया 22 जून 2021 ते 13 जुलै 2021 या कालावधीत सुरू राहतील. बंद निविदा सादर करण्याची प्रक्रिया 22 जून 2021 ते 14 जुलै 2021 या कालावधीत सुरू राहिल. तर ई-लिलाव प्रक्रिया 15 जुलै 2021 रोजी पार पडणार आहे.या योजनेमुळे अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत, सामाजिक व वाणिज्यिक सुविधा असणाऱ्या नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे. उपनगरीय रेल्वे, महामार्ग व अंतर्गत रस्त्यांचे जाळे, यांमुळे नवी मुंबईला उत्तम संधानता (कनेक्टिव्हिटी) लाभली आहे. नजीकच्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. तसेच सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे. नियोजित कॉर्पोरेट पार्क प्रकल्पामुळे शहराच्या वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत होणार आहेत. लहान आकाराच्या भूखंडांमुळे विशेषत:,सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपले मनपसंत घर साकारण्याची शेवटची संधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.