नवी मुंबई - कोव्हीडच्या पहिल्या व दुस-या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. त्याचप्रमाणे कोव्हीडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मिकरित्या सामोरे जावे लागलेले आहे.त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा अनाथ बालकांची तसेच कोव्हीडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे ही महानगरपालिकेची सामाजिक बांधिलकी आहे हे लक्षात घेत अशा संकटकाळात अनाथ मुलांना तसेच पती गमावलेल्या पत्नीला मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार समाजविकास विभागाच्या माध्यमातून चार कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.
(अ) कोव्हीडमुळे दोन्ही पालक / एक पालक गमावलेल्या मुलांकरिता कल्याणकारी योजना-
(i) कोव्हीडमुळे दो्न्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
एक पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य
वय वर्ष 0 ते 5 - रू. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 0 ते 5 - रू. 1000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रू. 4000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रू. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रू. 6000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रू. 3000 प्रतिमहा
वरील टप्प्यांनुसार ते बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणा-या अर्थसहाय्यास पात्र राहील.
(ii) अनाथ मुलांच्या शिक्षणाकरिता महानगरपालिकेमार्फत आधीपासूनच स्वतंत्र योजना सुरू असल्याने
कोव्हीडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींकरिता शैक्षणिक
बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी अर्थसहाय्य - रू. 50 हजार प्रतिवर्ष.
(ब) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलांकरिता कल्याणकारी योजना-
(i) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एकरक्कमी अर्थसहाय्य देणे - रू. 1.50 लक्ष अर्थसहाय्य.
त्याचप्रमाणे -
(ii) कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस स्वयंरोजगारासाठी साहित्य संच उपलब्ध करून घेणेकरिता
अर्थसहाय्य करणे - स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलेस संपूर्ण हयातीत एकदाच रू. 1 लक्ष
रक्कमेपर्यंतचे अर्थसहाय्य ( दोन टप्प्यात ).
कोव्हीडमुळे पतीचे निधन झालेली महिला या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील.
या चारही योजनांची सविस्तर माहिती, सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in यावर- 'विभाग' → 'समाजविकास' → समाजविकास विभाग सेवा' → 'कोव्हीड योजना' या लिंकवर सहजपणे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे उपआयुक्त (समाजविकास), तळमजला, महापालिका मुख्यालय, सेक्टर 15, सीबीडी बेलापूर किंवा समाजविकास विभाग कार्यालय, पहिला मजला, बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर याठिकाणीही कार्यालयीन वेळेत माहिती उपलब्ध होऊ शकेल.कोव्हिडचा काळ हा सर्वांसाठी अत्यंत कठीण होता. दुर्दैवाने अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय कोव्हीडमुळे गमावले. ही झालेली हानी कोणीच भरून काढू शकत नाही. मात्र दोन्ही किंवा एक पालक गमावलेली मुले तसेच कोव्हिडमुळे वैधव्य आलेल्या महिला यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून जगण्याची उभारी देणे आवश्यक आहे. त्यासाठी छोटेसे योगदान म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या 4 नवीन योजना राबविल्या जात असल्याचे सांगत कोव्हीडमुळे मृत्यू झाल्याने ज्या मुलांनी आपले एक किंवा दोन्ही पालक गमावलेले आहेत अशा मुलांचा सांभाळ करणा-या व्यक्ती/संस्था यांनी अथवा आपले पती गमावलेले आहेत अशा महिलांनी महानगरपालिकेच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजविकास विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.