नवी मुंबई - खासदार राजन विचारे यांनी नव्याने नियुक्ती झालेल्या मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या दालनात ठाणे व नवी मुंबई रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत मध्य रेल्वे, एम एम आर डी ए, ठाणे महानगरपालिका या विभागांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मंगळवार रोजी बैठक संपन्न झाली त्यावेळी खासदार राजन विचारे, मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, मुख्य अभियंता अश्वनी सक्सेना, मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक शलभ गोयल, एम आर व्ही सी चे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल तसेच रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी मनोजकुमार शर्मा, एम एम आर डी ए चे अभियंता सुर्वे, ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता पापळकर उपस्थित होते.
सदर बैठकीत खासदार राजन विचारे यांनी सर्वप्रथम ठाणे हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावरील रेल्वे कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाबाबत विचारणा केली असता सदर तयार झालेला पुल खुला केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे पुलाची गर्डर काढून त्या ठिकाणी नवीन गर्डर बसवून पूल ९ महिन्यात पूर्ण करून देऊ.असे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना दिले.त्यानंतर ठाणे पूर्व कोपरी येथे सुरू असलेल्या सॅटीस २ प्रकल्पाचे स्टेशन परिसरात काम सुरू न झाल्याने चर्चा करीत असताना रेल्वेने समझोता करार तातडीने करून घेण्याचे सांगण्यात आलेले आहे. सदर करारनामा मध्ये रेल्वेची जबाबदारी व ठाणे स्मार्ट सिटी यांची जबाबदारी याबाबत ठाणे महानगरपालिका व इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अथोरिटी यांच्या दरम्यान समझोता करार आठवडाभरात करून देण्याचे आश्वासन ठाणे महापालिकेचे उपनगर अभियंता पापळकर यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांना दिले.ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा अतिरिक्त वाढलेला भार कमी करण्यासाठी आवश्यक असलेला ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाच्या कामासंदर्भात चर्चा करीत असताना रेल्वे महाव्यवस्थापक यांनी या नव्याने होणाऱ्या रेल्वेस्थानकाच्या आराखडा अंतिम मंजुरीसाठी रेल्वेचे अधिकारी व ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बसून अंतिम निर्णय घ्यावा असे रेल्वे महाव्यवस्थापक यांनी म्हटले.खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या मुंबई व कल्याण दिशेस ठाणे महापालिकेने निधी उपलब्ध केलेल्या पादचारी पुलाच्या कामाची विचारणा केली असता याचे काम सुरू असून ठाणे महानगरपालिकेने दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे फंड वर्ग करावा.जेणेकरून या कामाला गती मिळू शकेल.तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकातील अपूर्ण अवस्थेत ठेवलेला पार्किंग प्लाझा व रेल्वे वसाहतीतील धोकादायक ठरलेल्या इमारती तोडून त्यावर नवीन पार्किंग प्लाझा उभी करण्याच्या मागणी बाबत विचारणा केली असता. रेल्वेने निविदा प्रक्रिया केली असून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने हे काम रखडल्याची माहिती दिली आहे. तसेच रेल्वे मार्फत पुन्हा याची निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे अशी माहिती रेल्वे महाव्यवस्थापकांनी खासदार राजन विचारे यांना दिली. पार्किंग प्लाझा व ठाणे रेल्वे स्थानकात धोकादायक झालेल्या इमारतीसाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही इतर कामासाठी वापरू नका जेणेकरून या कामास विलंब लागेल अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या संख्येत वाढ करण्यासाठी एम आर व्ही सी मार्फत सुरु असलेल्या ५ व्या व ६ व्या लाईन च्या कामाबाबत चर्चा करीत असताना सदर काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून खासदार राजन विचारे यांना दिले. तसेच खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वे मार्गावरील १५ डब्यांची लोकल केव्हा पासून सुरू करता यावर विचारणा केली असता. कल्याणच्या पुढील स्टेशनच्या कामास नुकतीच मंजुरी मिळाली असून जोपर्यंत ती कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत १५ डब्यांची लोकल सुरू करता येणार नाही. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत तरी १५ डब्यांची लोकल सुरु करावी अशी मागणी त्या वेळी केली. असता याबाबत निर्णय घेऊन आम्ही तुम्हाला कळवू असे रेल्वे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. त्याचबरोबर रेल्वे स्थानकात फलाटावर बंद पडलेल्या जल शुद्धीकरण यांत्राबाबत विचारणा केली असता नुकताच रेल्वे बोर्डाने आय आर सी टी सी यांना रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाली असून त्याची निविदा प्रक्रिया १५ दिवसात होणार असल्याचे सांगण्यात आलेले आहेमासिक पास काढलेल्या रेल्वे प्रवाशांना पुन्हा पुन्हा २ डोस (लसीकरण) घेतलेले प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) मागण्यात येते यावर लवकरच विचार करून प्रवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन रेल्वे महाव्यवस्थापक यांनी दिले. तसेच रेल्वे स्थानकातील फेरीवाले, रेल्वे स्टेशन मास्तर, आर पी एफ जी आर पी यांच्याद्वारे रेल्वे स्थानकात आपले सामान महापालिकेच्या कारवाई वेळी ठेवीत असतात यासाठी रेल्वे व महापालिका यांच्यात एकत्रित बैठक (जॉईंट मीटिंग) आयोजित करून जबाबदारी निश्चित करावी. तसेच महिला व पुरुष वातानुकूलित शौचालयमध्ये वाढ करावी अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना खासदार राजन विचारे यांनी दिल्या.खासदार राजन विचारे यांनी आज ठाणे व नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत चर्चा करीत असताना त्यांनी ठाणे या ऐतिहासिक अशा रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात नाविन्यपूर्ण अशी कामे करण्याचे पत्र त्यांना देण्यात आलेले आहे. त्यासाठी नव्याने बसविण्यात आलेल्या रेल्वे इंजिनच्या सभोवतालचा परिसर विकसित करण्यासाठी खासदार निधीचा वापर करावा तसेच या नव्याने होणाऱ्या इमारतीचा आराखडा अत्याधुनिक पद्धतीने करावा जेणेकरून त्यामध्ये प्रतीक्षा कक्ष म्युझियम करण्यात येईल.
मध्य रेल्वे व सिडको व्यवस्थापकीय संचालक यांच्यात लवकरच बैठकीचे आयोजन करणार - खासदार राजन विचारे
खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडताना नवी मुंबईतील ऐरोली - कळवा एलिव्हेटेड या रेल्वे प्रकल्पातील बस स्थानकाची व दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकेच्या कामाची एम आर व्ही सी च्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता दिघा स्थानकाचे काम नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मार्गिकाचे काम त्यांना त्यांची हक्काची घरे मिळाल्यानंतरच सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले.एम आर व्ही सी ने बेलापूर येथील आग्रोळी व आयकर कॉलनी येथे निर्माण केलेल्या पादचारी पुलावर विद्युत व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी विद्युत व्यवस्था करण्याच्या सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.नेरुळ ते उरण या मार्गावर नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानकांची कामे कधी पूर्ण होणार आहेत. त्याची विचारणा केली असता गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, व द्रोणागिरी तसेच उरण रेल्वे स्थानकांची कामे सुरू असून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे.तसेच नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकात ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट किंवा सरकते जिने तसेच भुयारी मार्गासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत रेल्वेने बैठक आयोजित करावी. व या बैठकीला मला आमंत्रित करावे अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली. लवकरच बैठक आयोजित करू असे आश्वासन रेल्वे महाव्यवस्थापक यांनी खासदार राजन विचारे यांना दिले.