नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर

नवी मुंबई :- १७ सप्टेंबरपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत उत्साहात सुरू झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याची आणि ‘स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता’ अभियानाची सांगता वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 7500 हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीत भव्यतम स्वच्छता महोत्सवाच्या माध्यमातून जल्लोषात संपन्न झाली. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ या ध्येयवाक्याच्या जोरदार निनादात सारे वातावरण भारून गेले होते.याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा.नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, स्वच्छता आयकॉन सुलेखनकार अच्युत पालव व साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी, नामांकित अभिनेत्री राधिका देशपांडे, दिपाली पानसरे, केतकी नारायण, भाग्यश्री मोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  

              आज ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याची सांगता असली तरी पुढे कायम राखावयाच्या स्वच्छतेचा हा शुभारंभ असल्याचे मत यावेळी ठाणे लोकसभा सदस्य खा.श्री.नरेश म्हस्के यांनी व्यक्त करीत नवी मुंबई महानगरपालिकेने या मोहीमेत ज्यांच्या खांद्यावर उद्याचे भविष्य आहे अशा विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी करून घेतल्याबद्दल प्रशंसा केली. स्वच्छता ही उपदेश करण्याची गोष्ट नाही तर प्रत्यक्ष कृती करूनच स्वत:पासून सुरूवात करायला हवी असे त्यांनी सांगितले. महानगरपालिका आणि जनता यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची मानसिकता ठेवली तर काहीच अशक्य नाही असे सांगत खा.श्री.नरेश म्हस्के यांनी आपल्यासमोर कोणी अस्वच्छता करीत असेल तर त्याला त्यापासून रोखणे हे देखील शहराप्रती आपल्या मनात असलेले प्रेम व्यक्त करण्यासारखेच आहे असे मत मांडले.महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात दररोज ठिकठिकाणी होणा-या विविध उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले त्याबद्दल आभार मानले. नाविन्यपूर्ण कामांमुळे नवी मुंबईची देशात वेगळी ओळख असून त्यामध्ये नागरिकांच्या नेहमीच मिळणा-या सहकार्याचा महत्वाचा वाटा असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी केला. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेत लहान वयापासूनच त्यांच्यावर स्वच्छतेचा संस्कार करण्याचा उद्देश विविध स्पर्धात्मक उपक्रमांतून सफल झाल्याबद्दल आयुक्तांनी आनंद व्यक्त केला. यापुढील काळात ‘वेस्ट टू एनर्जी’ तसेच ‘टेक्सटाईल रिसायकलींग’ यासारख्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून नवी मुंबईचा नावलौकिक देशपातळीवर अधिक उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यातील प्रत्येक उपक्रमाला नागरिकांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे सांगितले. अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेत या कालावधीमध्ये शाळाशाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छताविषयक स्पर्धा उपक्रमांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मनात स्वच्छतेचा संस्कार रूजवला गेला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.नवी मुंबई हे इतर शहरांनी हेवा करावे असे शहर असून स्वच्छतेचे महत्व सांगण्यासाठी लहान मुलांना मोठ्या संख्येने एकत्र आणून त्यांचा स्व-भाव स्वच्छतेचा व्हावा व त्यांच्या मनात स्वच्छतेचा संस्कार रूजावा यासाठी राबविल्या जात असलेल्या उपक्रमांचे अभिनेत्री श्रीम. राधिका देशपांडे यांनी कौतुक केले. 12 प्रकारचे संस्कार असतात याची माहिती देत त्यांनी आपल्याला कचरा कमी करून तसेच कच-याचे घरातूनच वर्गीकरण करून सफाई मित्रांचे काम कमी करायचे आहे असे आवाहन केले.यावेळी जगप्रसिध्द आफ्रिन बँडच्या तालावर उपस्थित सूरांसमवेत रंगले व त्यांच्यासह ‘वंदे मातरम्’ चा गजर केला गेला. सुप्रसिध्द स्टँड अप शोमन सुशांत घाडगे यांनी स्वच्छतेच्या सवयींवर व विसंगतीवर हसतखेळत भाष्य केले. नमुंमपा शाळा क्र. 78 गौतमनगर, रबाळे यांनी स्वच्छता दिंडीच्या सादरीकरणातून परंपरेचे रंग भरले तसेच अल्पेश डान्स ॲकेडमीच्या समुहाने बहारदार स्वच्छता नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन करीत सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये सफाईमित्र एसटीपी ऑपरेटर निकेश पाटील व रमेश इंगळे तसेच स्वच्छतामित्र महादेव सोनावणे व स्वच्छता सखी सुजाता भोसले यांना ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ यांचे प्रत्येकी 2 – 2 लाख असे 4 लाख रक्कमेचे विमा कवच प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आले.‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यात शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छताविषयक विविध स्पर्धांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धेत सेंट मेरी स्कुल वाशीचा विद्यार्थी गितेश सहारकर तसेच वक्तृत्व स्पर्धेत मॉडर्न स्कुल वाशीचा विद्यार्थी दक्ष दत्तात्रय वगरे या 10 हजारहून अधिक सहभागी विद्यार्थ्यांतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता आयसीएल स्कुल वाशीचा विद्यार्थी विजय प्रकाश वायदंडे व व्दितीय क्रमांकाची विद्यार्थिनी नमुंमपा शाळा क्र. 29 जुहूगाव येथील आर्या आवळे यांनाही पारितोषिके प्रदान करण्यात आली.याशिवाय ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत सहयोग देणा-या संस्था लेट्स सेलिब्रेट फिटनेसच्या रिचा समित, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग संस्थेचे श्रीसदस्य प्रतिनिधी, तृतीयपंथियांच्या किन्नर माँ ट्रस्टच्या प्रमुख अनिता वाडेकर, एनएसएस युनीटचे जिल्हा समन्वयक नितीन देशमुख, स्वच्छता उपक्रमात सीएसआर सहकार्य देणारे कन्सर्टो पेमेंट सिस्टीम आर्किटेक्ट यांचाही गौरव करण्यात आला.सिडको एक्झिबिशन सेंटरला पताका व स्वच्छता फलकांनी सजवून महोत्सवाचे स्वरूप देण्यात आले होते. याठिकाणी शालेय स्तरावर 413 शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या 1 लाखाहून अधिक विद्यार्थी सहभाग लाभलेल्या टाकाऊपासून शोभिवंत वस्तू निर्मिती प्रदर्शनाच्या मोठ्या स्टॉलला आयुक्त व मान्यवरांप्रमाणेच इतर नागरिकांनी भेट देऊन टाकाऊपासून नाविन्यपूर्ण वस्तू निर्मिती करणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.याशिवाय कचरा विषयाशी संबंधित आगळ्यावेगळ्या खेळांच्या 3 स्टॉलवरही बच्चे कंपनीने गर्दी करीत आनंद घेतला. प्लास्टिकला कापडी पिशव्यांचा पर्याय असणारा स्टॉल तसेच समाजविकास, आरोग्य, उद्यान विभागांच्या स्टॉललाही नागरिकांनी भेट दिली व माहिती जाणून घेतली. बीजमोदक, ऑरगॅनिक अगरबत्ती, होम कम्पोस्टींग साहित्य यांचेही स्टॉल गजबजलेले होते. विशेषत्वाने ओलू, सुकू आणि घातकू हे राष्ट्रीय स्तरावर गाजलेले 3 मॅस्कॉट आणि स्वच्छतेचा आकर्षक सेल्फी स्टॅंड यावर छायाचित्रे काढण्यासाठी नागरिक व विद्यार्थीही उत्साही होते.भव्य व्यासपीठासमोर मांडलेला ‘स्वच्छता ही सेवा’ अक्षरे असलेला 50 x 30 आकाराचा भव्य कॅनव्हास 50 शाळांतील 12450 विद्यार्थ्यांनी चितारलेला असल्याने ते लक्षवेधी कॅनव्हास पेंटींग कार्यक्रमाचे आकर्षण होते. विद्यार्थी आणि नागरिकांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने स्वच्छतेविषयी नवी मुंबईकरांच्या मनात असलेले प्रेम आणि अभिमान अधिक व्यापकतेने अधोरेखित झाला. 

Popular posts
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image