नवी मुंबई (योगेश महाजन) :- काही दिवसांपूर्वी मनपा अतिक्रमण उपायुक्त राहुल गेठे यांनी एपीएमसी मार्केट मधील मार्जिनल स्पेस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर व अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.त्यानंतर गेठे यांच्यावर राजकीय व व्यापाऱ्यांचा दबाव वाढल्याने काही वेळ कारवाई स्थगित करण्यात आली तर त्यानंतर दिखाऊ कारवाया करण्यात आल्या.नंतर याही कारवाया थंड झाल्याने त्यात मोठी सेटलमेंट झाल्याची चर्चा एपीएमसी परिसरात सुरु झाली.मार्जिनल सेप्स व वाढीव अतिक्रमण यावर कारवाई होऊ नये म्हणून ७ ते ८ लाख रुपयांची प्रति महिना वसुली झाल्याची करण्यात येत असल्याची चर्चा एपीएमसी परिसरात सुरु आहे.
एपीएमसी मार्केट मधील माथाडी मार्केट, ग्रोहीतंम मार्केट, जलाराम मार्केट, ग्रोमा मार्केट व मर्चंट चेंबर मार्केट मध्ये विविध प्रकारचे व्यापारी व्यापार करत असून या ठिकाणी शहरातीलच नव्हे तर इतर शहरातीलही नागरिक खरेदी करण्यासाठी येत असतात.नागरिकांना वस्तु खरेदी करतांना कोणताही त्रास होऊ नये अथवा त्यांना अडचण येऊ नये यासाठी प्रत्येक दुकानाचा आजूबाजूला मार्जिनल स्पेस ठेवण्यात आले आहेत.मात्र याच मार्जिनल स्पेस चा व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वापर सुरु केल्याने त्यावर कारवाई होऊ नये म्हणून मनपा विभाग अधिकाऱ्यांना त्याचा मेवा देण्यात येत असल्याची चर्चा एपीएमसी परिसरात सुरु आहे.जलाराम मार्केट एपीएमसी च्या मुख्य चौकात असल्याने त्यातील व्यापाऱ्यांनी पथपथावरच कब्जा केला आहे.पदपथावरच व्यापाऱ्यांनी बस्तान मांडल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागते. मर्चंट चेंबर मधील व्यापाऱ्यांनी मार्केट च्या आतील भागात तर दुकानेच मार्जिनल स्पेस वर मांडल्याने नागरिकांना वाट काढत चालत जावे लागते,बाहेरही तीच परिस्थिती असल्याने सणासुदीच्या काळात तर धक्काबुक्की करत नागरिकांना चालत जावे लागते.याच चेंबर मध्ये पार्किंग असून त्यावरही व्यापाऱ्यांनी कब्जा केला आहे तर ज्या ठिकाणी वाहने येऊ जाऊ शकतात त्याच जागेवर मोठे टेबल लावून व्यापार मांडला आहे.या सर्व प्रकारामुळे वाहन धारकांना गाड्या बाहेरच लावाव्या लागत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी दिसून येते.पदपथावर किरकोळ व्यापारी व्यवसाय करत असल्याने त्यांनाही धाक राहिला नसल्याचे दिसून येते.ग्रोमा हाऊस मधील व्यापाऱ्यांनी बाहेरील मार्जिनल स्पेस चिवडा व इतर व्यापाऱ्यांना भाडेतत्वावर दिला असल्याचे दिसून येत असून पदपथापलीकडे टेम्पो व इतर वाहनात कायमस्वरूपी खाद्य पदार्थ विकले जात असल्याचे दिसून येते.या सर्व व्यापाऱ्यांमुळे नागरिकांना चालतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर वाहन चालकांना दिसेल त्या ठिकाणी वाहन उभे करावे लागते.ग्रोहीतम बिल्डिंग मधील व्यापाऱ्यांनीही मार्जिनल स्पेस वर बेकायदेशीर व्यापार मांडल्याचे दिसून येते.माथाडी भवन मधील व्यापाऱ्यांनीही मार्जिनल स्पेसवर व्यापार मांडल्याने अनेकवेळा नागरिकांसह वाहन धारकांचीही तारांबळ उडते.मार्केट मधील व्यापाऱ्यांबरोबर किरकोळ व्यापाऱ्यांनीही बेकायदेशीर बस्तान मांडले असल्याने अखेर कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व सुरु आहे यावर प्रश्नचिन्ह आहे.बेकायदेशीर व्यवसायामुळे बेकायदेशीर वाहतूक पार्किंग होत असल्याने याचा नाहक त्रास या मार्गावरून जाणाऱ्या वाहतूक धारकांना सोसावा लागतो. माथाडी भवन समोरील कृषी प्लाझा मधील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बाहेरील मार्जिनल स्पेस वर अतिक्रमण केले आहे.तुर्भे जनता मार्केट मधील बँक ऑफ बडोदाच्या बाजूलाच असलेल्या मार्जिनल स्पेस वर व्यापाऱ्यांनी लोखंडी कॉलम टाकून अतिक्रमण केले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.लोखंडी कॉलम टाकून चक्क नवीन दुकानेच टाकण्याचे काम सुरु असल्याचे दिसत असून त्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी व तेथील वसुली करण्यासाठी एक सुरक्षा रक्षक व करार पद्धतीवरील कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याची चर्चा सुरु आहे.एपीएमसी पाचही मार्केट मध्येही याच धर्तीवर लक्ष ठेवण्यासाठी व तेथील वसुली करण्यासाठी विभाग अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतला कर्मचारी ठेवण्यात आला असल्याची चर्चा सुरु आहे.वरील पाचही मार्केट हे ७ ते ८ लाख रुपये प्रतिमहिना देत असल्याची चर्चा असून इतर ठिकाणांकडूनही चांगली रक्कम मिळत असल्याची चर्चा आहे.वाशी सत्र प्लाझा च्या बाजूला गॅरेज मार्केट असून या ठिकाणांहूनही वसुली होत असल्याची चर्चा आहे.कोपरी गाव लगत सेकंड हॅन्ड गाड्या विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय असून अनेकांनी त्यासाठी लागणारे ऑफिस हे मोकळ्या जागेतच टाकले आहे तर काहींनी मिळेल त्या जागेवर कब्जा केला आहे.सदरील व्यवसाय टिकून राहावा यासाठीही प्रतिमहिना मेवा दिला जात असल्याची चर्चा असून त्यावर कितीही तक्रारी आल्या तर परस्पर पद्धतीने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते.तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून त्यांच्याकडून प्रमाणापेक्षा जास्त रक्कम घेऊन त्यांना अभय देण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचाराने कळसच मांडला असून मनपा आयुक्त याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.एकीकडे आपण नवी मुंबई मनपाची प्रतिमा सुधारण्यात करोडो रुपये खर्च करत असतांनाच काही ठिकाणी भ्र्रष्टाचाराचे करोडो रुपये खिशात घालण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.तुर्भे विभाग कार्यालय हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी समजली जात असून या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकारी प्रयत्न करत असल्याचे दिसून येतात.तर काही जण येताच डल्ला मारतानाही दिसून येतात.अश्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज असून त्यांचे प्रबोधन करण्याचीही गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.